तर.. मुद्दा हा की, अनेक वेळा कोणत्याही गोष्टीची ‘व्याख्या’ ही ती गोष्ट समजावून सांगण्याचा कमी, उलट तिला अधिकाधिक क्लिष्ट करण्याचाच प्रयत्न करत असते. अनेक वेळा तर व्याख्या ही त्या गोष्टीसंदर्भात असलेल्या अज्ञानाला लपवून फार सखोल माहिती असल्याचा आवसुद्धा आणते. कोणतेही नवीन क्षेत्र उदयास आले की, त्यासोबत त्या क्षेत्राशी निगडित वेगळा शब्दकोशसुद्धा बनत जातो, ज्याचा वापर पुन्हा त्या मूळ व्याख्येला अधिक क्लिष्ट करण्यासाठी होतो! ‘ब्लॉकचेन’ही यास अपवाद नाही. जसे आपण मागील लेखात पाहिले की, तिहेरी नोंद हिशेब पद्धत अर्थात ‘ट्रिपल एण्ट्री अकाऊन्टिंग’ हेसुद्धा काहींच्या मते ब्लॉकचेनचे दुसरे नाव असू शकते- जरी ते ब्लॉकचेन किंवा बिटकॉइन यांच्यापेक्षा जवळपास दोन दशकांहून जुने आहे. तसेच आज ब्लॉकचेनला त्याच्या आणखी एका प्रचलित नावाने समजून घेऊ या : वितरित विकेंद्रित नोंदखाते अर्थात डिस्ट्रिब्युटेड डिसेन्ट्रलाइज्ड लेजर! तर.. आधी (आपल्या पद्धतीप्रमाणे!) यातल्या प्रत्येक शब्दाला स्वतंत्रपणे समजून घेऊ या. मग समजून घेतलेल्या तिन्ही शब्दांना एकत्र जोडून त्याचा काय अर्थ निघतो, ते पाहू या.
सुरुवात करू ‘वितरित’ या शब्दापासून आणि त्याचा संगणकशास्त्रात काय अर्थ निघतो, हे पाहून. उदाहरण घेऊ फेसबुकचे. जेव्हा मार्क झकरबर्ग यांनी फेसबुक बनवायला सुरुवात केली असेल, तेव्हा सर्वात आधी स्वतच्या संगणकावर प्रयोग म्हणून सुरुवात केली असेल. पण आज फेसबुकचे जवळपास २५० कोटी वापरकर्ते आहेत. इतक्या साऱ्या लोकांना फेसबुकची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी झकरबर्ग यांचा एकच संगणक पुरेसा असेल का? अर्थात नाहीच. मग एकच भला मोठा संगणक बनवला तर? हे सध्या आसपास शक्य नाही; पण समजा, झकरबर्ग यांनी चंद्रावर जागा विकत घेऊन एक भलामोठा संगणक बनवलाच- जो २५० कोटी पृथ्वीवासीयांना फेसबुकची सेवा उपलब्ध करून देईल; तर असे काही करणे योग्य ठरेल का? चंद्रावर काही समस्या उद्भवल्या तर? असे काही झाल्यास फेसबुक एका झटक्यात बंद पडेल की!
जे फेसबुकसाठी खरे आहे, तेच अनेक प्रणाली आणि तंत्रांसाठीसुद्धा खरे आहे. म्हणून आपण सगळी प्रणाली एकाच ठिकाणी ‘एकत्रित’ न ठेवता भौगोलिकदृष्टय़ा आणि संगणकीयदृष्टय़ा ‘वितरित’ ठेवतो. याने आपल्याला प्रणाली मोठी करता येतेच, पण त्याच वेळी सगळी प्रणाली एकाच ठिकाणी ठेवून ती फक्त एका धोक्याने संपुष्टात येऊ शकेल ही शक्यतासुद्धा आपण टाळतो. ‘वितरित प्रणाली’ (डिस्ट्रिब्युटेड सिस्टीम) हा संगणकशास्त्रातील बराच जुना आणि विकसित विषय आहे. म्हणजे जेव्हा एक प्रणाली एकाच ठिकाणी ‘एकत्रित’ नसून अनेक ठिकाणी विखुरली असेल, तर त्याला आपण ‘वितरित’ म्हणतो. तुमच्या बँकेची शाखा जरी एकाच ठिकाणी असली, तरी तुम्ही आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणतेही, कुठलेही एटीएम वापरू शकता. काही कारणाने एटीएम चालत नसेल, तर आपण दुसरे वापरू शकतो. हेदेखील ‘वितरित प्रणाली’चे एक उदाहरण आहे.
जसे ‘वितरित’ किंवा ‘एकत्रित’ हे शब्द तुमची प्रणाली एकाच ठिकाणावरून काम करते की अनेक ठिकाणांवरून काम करते, हे दर्शवतात. तर.. हे ध्यानात ठेवूनच आपण ‘विकेंद्रित’ या शब्दापाशी येऊ. ‘विकेंद्रित’ किंवा ‘केंद्रित’ हे शब्द ‘नियंत्रण’ दर्शवतात. वर आपण जे एटीएमचे उदाहरण पाहिले, तेच पुढे नेऊ या. एटीएम हे वेगवेगळ्या ठिकाणी विभागले असतील, पण असे कधीच होणार नाही की, तुम्हाला एका एटीएममध्ये खात्यातील शिल्लक रक्कम पाच हजार रुपये दिसते आणि बाजूच्या गल्लीतील एटीएममध्ये गेल्यावर दहा हजार रुपये दिसेल. हे शक्य होते, कारण सगळ्या एटीएमचे नियंत्रण किंवा तुमच्या खात्याचे नियंत्रण हे पूर्णपणे एकाच बँकेकडे दिलेले आहे. जिथे कुठे नियंत्रण हे एकाच ठिकाणी आहे, त्याला आपण ‘केंद्रित’ प्रणाली किंवा तंत्र म्हणतो. परंतु जर त्या प्रणालीवरील किंवा तंत्रावरील नियंत्रण हे अनेक व्यक्तींमध्ये किंवा संस्थांमध्ये विभागले असेल, तर ती ‘विकेंद्रित’ प्रणाली झाली. ‘विकेंद्रित’ (डिसेन्ट्रलाइज्ड) या शब्दाची रचना एकोणिसाव्या शतकात अलेक्सी दी टोकव्हीये या फ्रेंच अधिकाऱ्याने अमेरिकेतील अनेक राज्यांची राजकीय बांधणी समजून सांगण्यासाठी केली होती. मात्र, टोकव्हीये यांनी ‘विकेंद्रीकरण’ची व्याख्या नुसती राजकीय रचनेपुरती मर्यादित न ठेवता, त्यामध्ये नागरिकत्वाचा पलूसुद्धा मांडला होता. म्हणजे विकेंद्रीकरण हे सामान्य नागरिकांनासुद्धा काही प्रमाणात निर्णयप्रक्रियेत समाविष्ट करेल. यावरून हेही आपल्या लक्षात आले असेलच की, ‘विकेंद्रित’ प्रणाली ही ‘वितरित’ प्रणालीचाच एक उपसंच आहे. म्हणजे असे की, सहसा कोणतीही ‘वितरित’ प्रणाली ही ‘केंद्रित’ असू शकते (जसे आपले बँक खाते आणि एटीएमचे उदाहरण) किंवा ‘विकेंद्रित’ही असू शकते. उदाहरणार्थ, बिटकॉइन- ज्याच्यामध्ये कोणतीच केंद्रीय संस्था किंवा व्यक्ती नाही. बिटकॉइनचा जनक सातोशी नाकोमोटो या व्यक्तीकडेसुद्धा कोणतेही विशेषाधिकार नाहीत.
आता आपण येऊ या नोंदखाते (लेजर) या शब्दावर. बिटकॉइनमध्ये असे वेगळे काही ‘कॉइन’ किंवा ‘नाणे’ नाही, ज्याला त्या बिटकॉइनच्या विश्वाबाहेर काही अस्तित्व आहे. बिटकॉइन हे फक्त एक जागतिक पातळीवरील नोंदखाते आहे, ज्यामध्ये फक्त आणि फक्त व्यवहारांची नोंदणी आहे. ही सर्व नोंदणी कोणत्या ठिकाणी ठेवली आहे? तर ती सर्वत्र पसरली आहे, प्रत्येक ‘बिटकॉइन मायनर’ (जसे खाणीतील कामगार खाणीतून धातू काढतात, तसे बिटकॉइनचे मायनर हे बिटकॉइनच्या खाणीतून नवीन बिटकॉइन जन्मास आणतात. हे कसे होते ते आपण या सदरात पाहूच!) आणि कोणाला बिटकॉइन मायनर बनता येते? तर त्याचे उत्तर असे : कोणालाही मायनर बनून या प्रणालीत भाग घेता येतो. कोणते व्यवहार खोटे आणि कोणते खरे हे ठरवण्यासाठी इथे कोणती एक बँक किंवा बँकेचा व्यवस्थापक अस्तित्वात नसून, एका प्रकारे लोकशाही पद्धतीने सर्व ठरवले जाते.
म्हणून बिटकॉइनला किंवा मूळ ब्लॉकचेनला ‘वितरित विकेंद्रित नोंदखाते’ असे संबोधले जाते. बिटकॉइनसाठी ही व्याख्या जरी साजेशी असली, तरी आता विविध प्रकारचे ‘ब्लॉकचेन’ अस्तित्वात आले आहेत, ज्यामध्ये किती प्रमाणात विकेंद्रीकरण किंवा किती प्रमाणात वितरितपणा असावा हे आपण आपल्या गरजेनुसार ठरवू शकतो. उदाहरणार्थ, जर आपण जमिनीच्या मालकीसंदर्भातल्या नोंदणीबद्दल बोलणार असू, तर तिथे कधी ब्लॉकचेनची गरज भासल्यास आपल्याला तहसीलदार किंवा तलाठी यांना काही विशेषाधिकार द्यावे लागणार. याने ‘ब्लॉकचेन’ प्रणालीचा विकेंद्रितपणा बऱ्याच प्रमाणात कमी होईल; पण त्या समस्येला उद्देशून ब्लॉकचेनद्वारेच काही उपाय उपलब्ध करू शकू.
या लेखाचा मूळ उद्देश हा होता की, बिटकॉइन किंवा ब्लॉकचेनसोबत जोडल्या गेलेल्या शब्दांना नीट समजून घेणे आणि ते करत करत या संकल्पनेबद्दल आपली समज आणखी स्पष्ट करत जाणे. एकदा हे झाले की, पुढील लेखांमध्ये आपण आणखी खोलात चर्चा करायला मोकळे!
Copyright © 2025 Emertech Innovations. All Rights Reserved By Emertech.io